May 1, 2018

शोध अंधारातल्या सूर्याचा

"ज्यावेळी घटना आपल्या आजूबाजूला आणि निकटच्या लोकांबरोबर घडतात त्यावेळी एरवी षंढत्व पत्करलेल्या आपल्या मनाला विचारांची पालवी फुटते."
   माझ्या वडिलांचे सहकारी आणि दूरचे पाहुणे असे एक गृहस्थ नुकतेच रिटायर झाले होते. कामाची प्रचंड आवड असल्याने निवृत्तीनंतरही कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळवून नुकतेच काम सुरु झालेले. दोन तीन दिवसांपूर्वी एका लग्नाला हजर राहण्यासाठी, स्वतःची चार-चाकी सरकारी कार्यालयात लाऊन एका सहकर्मचाऱ्याची दुचाकी घेऊन शहराबाहेर काहीच अंतरावर असलेल्या विवाह सोहळ्यास निघाले. रस्ता एका बाजुहून विरुद्ध बाजूला पार करत असता एका अवजड वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते रस्त्याच्या बाजूच्या दुभाजक कठड्यावर आदळले. दुभाजकाची बाहेर आलेली लोखंडी सळी त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूने आत घुसली. सतर्क नागरिकांनी त्वरित त्यांना रुग्णालयांत दाखल केले. गंभीर दुखापातीमुळे अतिदक्षता विभागात भरती केलेल्या त्या ग्रहस्तांची जगण्याची संधी डॉक्टरांच्या मते अगधी नगण्य होती. ते कोमात गेले होते. 

या ग्रहस्थांचे आपल्या एकुलत्या अभियंता असलेल्या मुलावर अत्यंत प्रेम होते. आजवरच्या त्याच्या जीवनाच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. परंतु लोकासंख्येच्या भस्मासुराने वेढलेल्या आणि सरकारच्या व्यवस्थापन शून्य कारभारामुळे नामांकित तंत्र शिक्षण संस्थेतून स्थापथ्य अभियंता असलेलेया या मुलाला इच्छित असा रोजगार मिळाला नव्हता. काहीच दिवसांपूर्वी वडिलांसोबत नवीन अशा व्यवसायाचे स्वप्न त्याने पहिले होते. झाल्या प्रकाराने व जबाबदारीच्या प्रचंड तणावाने निराश झालेल्या, भवितव्याच्या अनिश्चिततेमुळे आणि घरामध्ये समजून सांगणारे जास्ती कोणी नसल्यामुळे एकटे पडल्याची भवना निर्माण होऊन, वडील रुग्णालयात असतानाच त्याने राहत्या घरी गळ्फास लाऊन घेउन आत्महत्या केली. काही तासातच त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी विधवा झालेल्या पत्नीला आणि स्वतःचा अविवाहित तरुण मुलगा गमावलेल्या आईला रडताही येईना. कोणासाठी आणि कोणावर अवलंबून जगावे असा प्रश्न पडलेल्या आईलाही आता जगून काय करायचे असा प्रश्न पडला व तिच्याही तोंडून उद्गार आले की नुसती हाक द्या मी ही येते.



        खरतर झाला प्रकार टळला असता, दोन्ही चालक वाहन चालवताना सतर्क राहिले असते तर.. जर त्या ग्रहस्थांनी हेल्मेट वापरले असते तर.. किंवा त्यांनी दुचाकी ऐवजी पेट्रोलच्या दराचा विचार न करता चार चाकी वापरली असती तर.. जर वाहतूक नियंत्रण शाखेने हेल्मेट सक्ती केली असती तर.. रस्ते विभागाने  दुभाजकांची झालेली दुर्दशा नाहीशी केली असती तर.. रस्ता क्रोसिंग सुलभ केले असते तर.. एरवी निवडणूका आल्यावर ‘सर्वांसाठी रोजगार’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या सरकारने आपल्या घोषणा सत्यात उतरवल्या असत्या तर.. बाजारू शिक्षण पद्धतींतून नष्ट झालेली व जीवनाचे महत्त्व पटवून देणारी जीवन मुल्ये आजही अस्थित्वात असती तर.. वयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाहीशी होत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती आजही मूळ धरून असती तर..
                भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, धर्मांधता, भेदभाव करणारी जातीव्यवस्था, स्वार्थी राजकारणासाठी आपल्याच नागरिकांमध्ये फुटीरता निर्माण करण्याची वृत्ती, श्रीमंत व गरीब यांसाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था, अस्थिर अर्थव्यवस्था, विज्ञान-शून्य दृष्टीकोन, कुपोषण, शेतकरी अन्नदात्यालाही लुटणाऱ्या या देशात  वरील "जर तर.." ची उत्तरे शोधणे म्हणजे अंधाऱ्या रात्री सूर्याला शोधन्यासारखेच नव्हे काय .                                                                                                                    

                                                                                                                                                                                                                                       ...   विश्व ताऱ्यांचे