May 18, 2023

भाऊ

 

मध्यंतरी कोणीतरी सहजरीत्या बोलून गेलेतू तुझ्या दादांवर लेख लिहिलास तसा भाऊंच्या विषयी असा लेख लिही पाहू.. ते मनात राहून गेले आणि आज भाऊंच्या स्मृतिदिनी लिहायला बसलो. 

श्री. सखाराम जोतिराम हावळ (गुरुजी), रा.पन्हाळा हे माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा. जवळ जवळ  २० ते २२ जणांच्या हावळ कुटुंबियात सर्वजण माझ्या आजोबांना भाऊ असे संबोधत. सहाजिकच ते हावळ कुंटुंबातील सर्वात ज्येष्ठ असल्याने तेच कुटुंबप्रमुख होते.


माझ्यासाठी   भाऊ या शब्दाला समांतर शब्द म्हणजे कर्मयोगी.. शिस्त, नित्यकर्म आणि व्यवहार ही भाऊंच्या जीवनाची त्रिसूत्री होती. आठवडा भर शिक्षकी पेशा, रविवारी धान्य व्यापार तसेच निवृत्ती नंतर धान्य व्यापार, पिठाची गिरणी, भात भरडणे आणि चटणी कांडप यंत्र यांमुळे सुट्टी आणि निवृत्ती हे शब्द भाऊंच्या शब्दकोशात अजिबात अस्तित्वातच नव्हते असे म्हणा ! शिस्त हा गुण   कदाचित त्यांच्या शिक्षकी पेशातून आणि आपल्या तत्त्वांवर ठाम राहणाच्या जिद्दीतून निर्माण झाला होता. आपली मूल्ये ही आपल्या येणाऱ्या पीढीने ही जोपासली पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास असायचा. कुटुंबातील प्रत्येकाने एकदातरी भाऊंचे बोल ऐकून घेतले असतील यात काही नवल नाही. भाऊ घरात नसताना टीव्ही वर मनोरंजन करत बसलेले आपण सर्व मंडळी भाऊ येताच कसे टीव्ही बंद करून आपआपल्या कामात पळून जायचो हे  आजही मला आठवते. पिठ्या काका बाहेर खिडकी जवळ उभा असायचा, आणि भाऊ येतायत असा इशारा करताच सर्वजण धूम ठोकायचे.. परंतु माझ्या मते त्या क्षणी कटू वाटणारे ते प्रसंग जीवनाच्या अंतापर्यन्त  चालणाऱ्या संग्रामासाठी खूप काही शिकवून जातात. जुन्या काळातील अकरावीचे बॉटनी (वनस्पति शास्त्र) इंग्रजीमध्ये पाठ असणे, आजतागायत आठवण काढणारे त्यांचे विद्यार्थी म्हणा, पीठाची  गिरण म्हणा किंवा रविवारचा बाजार या  सर्व क्षेत्रात एकाच वेळी चाललेली त्यांची यशस्वी घौडदौड यातून भाऊंची  कुशाग्र बुद्धिमता, व्यवहार कुशलता आणि समय सूचकता दिसून येते. या सगळ्या प्रवासात अण्णा (भाऊंचे धाकटे बंधू), आप्पा(भाऊंचे सर्वात लहान बंधू), काकू (अण्णांच्या पत्नी)ताई(अप्पांच्या पत्नी ) माझे सर्व काका आणि प्रामुख्याने माईची आई (माझी आज्जी, माझ्या धाकट्या आत्याला माई म्हणून संबोधत) आणि मालू काकी (माझी काकी) यांचे  योगदान खूपच मोलाचे होते. प्रियांका आणि प्रतिभा (माझ्या सख्या चुलत बहिणी) यांचे देखिल शिक्षण घेत असताना भाऊंच्या कार्यात दिलेले योगदानही विसरता येणार नाही.. 

वरून कितीही सक्त वाटणारे भाऊ, कमालीच कुटुंबवत्सल होते. त्यांची कुटुंबाची व्याख्या ही केवळ ते आणि त्यांची मुलं, मुली, सुना एवढीच नव्हती तर अखंड हावळ कुटूंब हे स्वतःचे  कुटूंब मानून ते एकत्र राहण्यासाठी भाऊ सतत तळमळीने प्रयत्नशील राहिले. जसजशे कुटूंबात नवीन सदस्य, नवीन विचारप्रवाह यायला लागले, तसे स्वाभविकणे असुरक्षित झालेले भाऊ आपल्याला दिसून येतात. कुटूंबाविषयीची अतीव आत्मीयता आणि सर्वांनी आपले ऐकले पाहिजे, ही भावना  हा एक भाऊंच्या स्वभावाचा कमकुवत पैलू  होता असा मला वाटतय. पण त्यामागे कुटुंबाबद्दल प्रचंड आपुलकी आणि सर्वांची प्रगती  व्हावी ही प्रामाणिक भावना होती हे मात्र मान्य करावेच लागेल. याचा प्रत्यय मम्मी-बाबांच्या सर्विसमूळे बाहेर राहणाऱ्या मला नेहमीच  यायचा, कारण ते माझ्याशी बोलताना आमचे पन्हाळा आमचा प्रशांत, आमचा सुनिल (हे दोघे माझे काका आहेत) अशा भाषेल बोलायचे.. ते  तुमच्याशी आमचा सनी (घरी मला सर्वजण सनी  या नावाने ओळखतात)  असं कधीच बोलले नसतील. असो!

नेहमीच कडक शिस्तप्रिय वाटणारे भाऊ आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र कमालीचे मवाळ आणि  मायाळू झालेले दिसले.. माईच्या आईची आजारपणात घेतलेली प्रचंड काळजी यातून भाऊंचा प्रेमळ स्वभाव दिसत होता. साधी कधी रिक्षा ही न करणारे भाऊ, आलिकडच्या काळात  मला कोल्हापूरला हॉटेलस मध्ये घेऊन जायचे. सी.पी.आर. जवळचा वडापाव बऱ्याचवेळा आम्ही मिठक्या मारत खाल्ला. सांगलीला आले की भाऊ माझ्यासोबतच झोपायचे. आमच्या गप्पा  रात्री- मध्यरात्री पर्यंत रंगायच्या. या काळात मला भाऊंचा खरतर खुप जवळून परिचय आला. लहानपणी तर एक शिस्तप्रिय कडक शिक्षकी पेशातले आजोबा आणि परगावी राहणारा कधीतर भेटणारा नातू असच नातं होत. आता मात्र आलिकडे काळात एखाद्या मित्रासारख्या गप्पा व्हायच्या. याच काळात मला भाऊंचं खूप जवळून जीवन दर्शन झाले.. मग ते हिरकणी आजीचे कष्ट असो वा अण्णा आणि आप्पांच्या मदतीने शुन्यातून निर्माण केलेले 'विश्व’, असो  की आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन असो किंवा माईच्या आईशीच लग्न करण्यासाठी भाऊंनी केलेले प्रयत्न असोत !

एका शब्दात सांगायचं झालं तर भाऊंचे जीवन हा एक संघर्ष होता. ज्यात त्यांनी कधीच हार मानली नाही. जीवनात अनेक वादळे सामोरे आली. त्यांना व्यक्तिश: प्रचंड त्यागाला सामोरे जावे लागले. स्पष्टवक्तेपणामुळे कटूता ही आली पण आपल्या सर्वांच्या निरंतर सोबतीमुळे भाऊंनी प्रत्येक वादळातून मार्ग काढले. 

लवकर स्वर्गवासी गेलेल्या वडिलांचा सर्वात मोठा मुलगा, मोठा भाऊ, कर्तव्य दक्ष वडील, एवढया सुनांचे सासरे, घरातले थोरले आजोबा एवढी सारी नाती भाऊंनी प्रभावीपणे निभावली. माझ्या मोठ्या काकाच्या घरातून जाण्यान निर्माण झालेली पोकळी, प्रियंका आणि प्रतिभा या माझ्या बहिणींसाठी भाऊंनी  परत एकदा आजोबा ते वाडीलकीच्या भूमिकेत येऊन पूर्ण ताकदीनीशी पेलवलेली आपल्या सर्वांनी पाहीली आहे. आपली कर्तव्ये पार पडण्यात ते कुठेच कमी पडले नाहीत. 

        आयुष्यभर पेटवत ठेवलेल्या कर्म-यज्ञामुळे आणि आशा आपेक्षांच्या यशापायशमुळे शेवटी भाऊंचा देह जरी शिणला असला तरी मनाची ताकद मात्र अजून ही युवकांना लाजवेल अशीच होती. वृद्धावस्थेत ही त्यांची कामाला जुंपून घ्यायची , धान्याची पोती उचलायची क्षमता अफाट होती. माझ्या मते त्यांनी आता थोडे जपून राहायला हवे होते. परंतु एवढ्या उर्जे ने भरलेले आयुष्यभर सुलाखून निघालेले मन ऐकल तर नवलच! आणि मग यातूनच त्यांना दवाखान्यात ऐन कोविड काळात दाखल करावे लागले. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते उठून  बसले होते. मला घरी घेऊन चला म्हणत होते. पण डॉक्टर लोकांचे आकडे विसंगत होते आणि २-३ दिवसांतच भाऊ आम्हाला सोडून गेले. 

     मुख्य गाठ सुटली. आता धागे स्वतंत्र झाले आपापल्या स्वातंत्र्यात भरारी घेण्यासाठी. पण गाठी मध्ये गुंतून राहण्यात असणारी शिस्तबद्ध आत्मीयता स्वातंत्र्याच्या पोरकेपणात थोडीच मिळेल?

      आपण सर्व हावळ कुटुंबीय व जोडलेले सर्व परिवार असेच नेहमी एकमेकांसोबत एकमेकांसाठी राहणे हीच खऱ्या अर्थाने भाऊंना आदरांजली दिल्या सारखी वाटेल. मला भाऊंचा म्हणावं तितका सहवास लाभला नाही याची ही खंत राहिलच. असो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.

                                                      

                                                                                                                                        .... विश्व ताऱ्यांचे