July 26, 2020

कल्पनेतलं वास्तव

एक असतं असणं
अन एक असतं वाटणं
दोहोंच्या मध्ये असतं
खूप सारं घुटमळणं

वाटण्याला नसतात सीमा
जणू इंद्राचं भव्य राज्य
असण्याला राहावं लागतं
सदैव जमिनीवर सज्ज

वाटण्याला असतात असंख्य
स्वप्नरंजित कल्पनांचे पंख
असण्याच्या कानांत निनादतात
वास्तवाचे चिरस्थित शंख

असणं आणि वाटणं 
जेंव्हा होतं एक समान
संदिग्धतेला नाही उरत
कोणतंच प्रमाण

सहस्त्रांमध्ये एक असतात
असे हे दुर्मिळ क्षण
जस असणं तसच वाटणं
स्वीकारते हे चंचल मन




                         ... विश्व  ताऱ्यांचे 

आयुष्याला सोपं बनवू आम्ही

आयुष्य होतं साधं सोपं
अवघड तयाला केलं आम्ही
अविचारी सैरभैर समंदरात 
नखशिखांत बुडालो आम्ही

स्वार्थ झाला मैतर भारी
पाहिले ते शोषिले आम्ही
अहंकार शिरपेचात रोवला 
ताठरली मान आम्ही

क्रोधाग्नि होती साक्षी जेंव्हा
भस्मिली नातीगोती आम्ही
सरावल्या कपट कल्पनांनी 
कारस्थाने केली आम्ही

साध्या सोप्या बेरीज वजाबाकीत 
गुणाकार भागाकार आणला आम्ही
आयुष्याच्या सोप्या गणितात
बाकी राहिलो 'मी' पणातले आम्ही

त्यागू आता स्वार्थी मैतर
एक होऊ सारे आम्ही
कपट, अविचार अन क्रोधाग्नीला
शिंपवू प्रेम वर्षावाने आम्ही

यश अपयशाची नकोच चिंता 
सोडू निंदा अन ईर्षा आम्ही
परोपकाराच्या पुष्पक विमानी 
होऊ सहप्रवासी आम्ही

एकमेका साह्य करू 
सद्भावे सहिष्णुता रुजवू आम्ही
पुनःश्च एकदा आयुष्याला 
खूप सोपं बनवू आम्ही

                                                                                                                              ... विश्व  ताऱ्यांचे 

February 22, 2020

एक पत्र.. छत्रपती शिवाजी महाराजांना

प्राणप्रिय छत्रपती शिवाजी महाराज,
मानाचा त्रिवार मुजरा.
राजं,
अवचित्य आपल्या जयंतीचं !.. अन त्यामुळे आपल्या नसल्याने निर्माण झालेल्या पोकळीचं!
" राजं, स्वराज्याच सुराज्य अजूनही नाही करू शकलो आम्ही. रयतेला आजही उदरनिर्वाह शोधावा लागतोय. बरीच रयत उपाशी आणि अर्धपोटी झोपते. शिक्षण खाजगी सरंजामशाहीच्या सापळ्यात सापडल्याने गरिबी आणि उच्च शिक्षण कधीही न मिळणाऱ्या समांतर रेषा झाल्यात. स्वराज्य चालवणारी बरीच मंत्रिमंडळं, आली अन गेली. पेशवाईत जडलेल्या काही सवयी मात्र नाही गेल्या. भ्रष्टाचार फणा काढून राज्याच्या तिजोरीवर विळखा घालून सरकारी इतमामात बसलेला असतो. आज ही बळीराजा पावसावर अवलंबुन आहे. तो शेवटी धीर सोडून आत्महत्या करत आहे. कारण तुमच्यासारखा वाली कोणी भेटलाच नाही राजं."
"राजं, तुम्ही परस्त्रीला माता समजायचं, आज इथे कित्येक स्वराज्यकांक्षीनि, मनुष्यदेहधारी दानवांच्या कामाग्नीत भस्म होतायत. पण या रावनांना त्वरित शिक्षा होत नाही. स्वराज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होती, ती होती तुमची निष्ठावंत रयत. तुम्ही कधीच भेदभाव नाही केलात. पण आज इथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, विविध जाती जमाती स्वतःचे स्वतंत्र मुलुख बनवू पाहतात.आशा वेळी तुमची कमतरता अतिशय हिरीरीने जाणवते."
 "राजं, तुम्हाला माहीत नसेल, पण आज कितीतरी राजकीय पक्ष तुमच्या नावाचा उपयोग करून घेतायत. तुम्ही तेंव्हा नसाल, त्याही पेक्षा आज खूप खूप प्रसिद्धी झोतात आहात. आपली दिव्य प्रतीमा प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये मिळेल. बरेच युवक तुमचं तेज, वापरून स्वतःची  केवळ शिवभक्त म्हणून ओळख निर्माण करू पाहतायत."
 "राजं, आपल्या महान पराक्रमाची गाथा संपूर्ण विश्वात गायली जातेय. पण तरीही तुमचं स्वराज्य अजून सुराज्य होऊ शकले नाही. कारण आपल्या सोयीनुसार आपल्या नावाचा फक्त वापर करून प्रौढी मिरवण्यात आजचा युवक गुंतलाय. जागो जागी आपले पुतळे स्थापित करून डी. जे. वर नृत्य चालू आहे."
     "आपली शिकवणूक, स्वराज्य प्रेम, पर स्त्री सन्मान, समता, राज्य कारभार, दृढता, दूरदृष्टी, अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची कर्मठता, मावळ्यांमध्ये निर्माण केलेली स्वराज्याविषयी प्राणांतिक निष्ठा या गोष्टी आजही केवळ आदर्श मानल्या जातात. तुमच्याच आधुनिक रयतेने एक म्हण पण शोधली आहे, 'शिवाजी जन्मावा तर शेजाऱ्याच्या घरात!"
    "म्हणून  राजं आज मना पासून अस वाटतंय की तुम्ही काही काळासाठी अवतरुन परत एकदा आमची कान टोचणी करा. सुराज्य स्थापन करायचं असेल तर केवळ तुमच्या प्रतिमेची औपचारिक पूजा न करता तुम्ही घाट घातलेल्या कार्यपद्धती, तुमच्या गुणांची  सहृदय उपासना व आचरण करावे लागेल. तुम्ही स्वतः येऊन आदेश दिलात तर जास्तीत जास्त रयत सुराज्य स्थापण्यास एकमताने प्रतिबद्ध होईल, आणि मग.. आपल्या स्वप्नातलं स्वराज्य साकार करण्यासाठी, जे आज 'महाराष्ट्र' नावाने ओळखले जाते, पुन्हा एकदा येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, कोंडोजी बाबा यांसारखी अनेक निष्ठावंत मंडळी पुन्हा एकदा जन्म घेतील. याच कारण इतकी वर्षे झाली पण आमचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा कमी न होता वाढतच चाललीय. एकीकडे भौतिक प्रगतिकडे धावत असताना, दुसऱ्या बाजूने होत असलेला मूल्यांचा ऱ्हास, आजही आपल्याच शिकवणीतुन रोखता येऊ शकतो. राजे पुन्हा जन्म घ्या."
   
हर हर महादेव .

निश्चयाचा महामेरु
बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी ।।


                                                                                                   ... विश्व  ताऱ्यांचे