October 19, 2021

दादा

 

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिच्या अस्तित्वाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागते. अशातच त्या व्यक्तीसाठी आपण पुरेस काही करू शकलो नाही तर हे आयुष्यभर सलत राहते.

असेच माझे दादा! दादा म्हणजे माझ्या आईचे वडील, श्री. आनंदराव कणेरे, आष्टा, वय ८९. आम्हीं सारे नातवंडं त्यांना प्रेमाने दादाच म्हणायचो. आजी शिक्षिका असल्यामुळे लोक त्यांना सर म्हणून संबोधायचे. दादा हे प्रथम मिलिटरी मॅन, नंतर रयत शिक्षण संस्थेत हेड क्लर्क व आयुष्याच्या उत्तरार्धात शेतकरी होते. थोडक्यात त्यांनी कधी रिटायरमेंट घेतलीच नाही. अलीकडच्या काळातच अक्का ( म्हणजे आमची आजी) गेल्यानंतर पाय घसरुन मांडीचे हाड मोडल्यामुळे ते झोपून होते व वाकर सहित मर्यादित हालचाल करत होते.

   अक्का म्हणजेच आजी दादांची केवळ धर्मपत्नी नव्हे तर मार्गर्शक तसेच जगण्याची सपोर्ट्सिस्टीम होती. दोघं एकमेकांना खूप जपत होती. परिणामतः ती गेल्यानंतर दादा काहीसे एकाकी आणि उदास जीवन जगत होते. अशातच त्यांना पायचे अधुत्व आल. पण मामा मामींनी व त्यांच्या मुला-मुलींनी त्यांची भरपूर सेवा केली व काही सुखाचे दिवस त्यांना दाखवले.

    क्लेरीकल विभागात काम केल्यामुळे ते आयुष्यात हिशोब करूनच तर्कसंगत निर्णय घ्यायचे. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा अगदी आतापर्यंत मांडत असत. यावरूनच त्यांची शिस्त दिसून येते. मिलिटरी मध्ये कमावलेल्या आरोग्यास कोणत्याही शारीरिक व्याधींनी आजतागायत त्यांना घेरले नाही. प्रेस केलेला शर्ट आणि फॉर्मल पँट असा त्यांचा शिस्तबध्द पोशाख असायचा. इंग्रजी तसेच कार्यालयीन मराठी भाषेचं त्यांचं ज्ञान वेळोवेळी निदर्शनास यायचं व कायदेशीर बाबींत उपयोगी पडायचे. जेवढे शिस्तप्रिय होते तितकेच प्रेमळ आणि कोमल होते दादा! मिलिटरी कॅन्टीन मधून उपयोगी मालासोबत ते नातवंडांना महागडी बिस्किट्स व खाऊ कधी आणायला विसरत नसतं.

     आपल्या तीनही मुलांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रसंगी आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवल्या. अक्का दादांनी मिळून आष्टा शहरात प्रशस्त जागेत टुमदार बंगला बांधून स्वतः साठी आणि मुलांसाठी  स्वतःच विश्व निर्माण केले. आज दोघेही त्या विश्वाचा भाग नाहीत, या विचाराने मन कासाविस होते.

      दादांना दुपारची झोप मोडलेली आवडत नसे. आम्ही नातवंडं मात्र पळापळ करायचो आणि त्यांच्या झोपेचं खोबरं व्हायचं.अशा वेळी ते म्हणायचे, " टिप्पिरा देऊ का?"मला त्याचा अर्थ कळायचा नाही. जेव्हा मी तो एकदा दोनदा खाल्ला तेंव्हा त्याचा अर्थ चांगलाच काळाला! ग्रामदेवता अंबाबाईचे ते निस्सीम भक्त होते.वर्षानुवर्षे नवरात्रात त्यांचा कड्क उपवास असायचा. गावच्या सुप्रसिद्ध भावई उत्सवात ते हिरीरीने अगदी अलीकडच्या काळापर्यंत भाग घ्यायचे. उत्सवात ते कैताळ हे वाद्य आवडीने वाजवायचे.

      आमच्या लहानपणी त्यांनी मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला पोहायला शिकवले. पोहून घरी येत असताना माझ्याच चुकीमुळे दोन वर्षांच्या फरकाने मी दोनवेळा दादांच्या सायकलीवरून पडलो. दोन्ही वेळा माझा डावा हात मोडला. पण दादांच्या व अक्काच्या खबरदारी ने तो बरा झाला. दादांनी यावेळी पूर्ण काळजी घेतली. त्यांचं आपल्या घराशी घट्ट नातं होत, जणू काही ही निर्जीव वास्तु त्यांच्यासाठी जिवंत व्यक्ती होती.त्यामुळे ते कोठेही परगावी गेले, कितीही आग्रह केला तरी तिथे राहत नसतं. बाहेच्या जगात अत्यंत मृदू स्वभावी, मितभाषी, इतरांशी आदराने वागणारे आणि विनाकारण कोणाच्याच वाकड्यात न जाणारे असे होत दादांचं व्यक्तिमत्त्व. त्यांनी कधीच आयुष्यात कोणावरही आधिकार गाजवण्याचा  प्रयत्न केला नाही.

    न जाणे कुठून ही काळरात्र आली आणि करोनारूपी ब्रम्हराक्षसाने अक्का दादांनी उभ्या केलेल्या विश्वात प्रवेश केला. वेळीच केलेल्या वैद्यकीय परीक्षनामुळे दादा  करोना positive असल्याचे कळले. हळुहळु तो ब्रम्हराक्षस घरातील सर्व सदस्यांच्या शरीरात तांडव करू लागला अन् अचानक खूप मोठ्या संकटाच सावट त्या घरावराती आले. नगरपालिकेने घरावरती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शिक्का मारला. त्यामुळे घरातून बाहेर आणि बाहेरून घरात कोणी जाऊ शकत नव्हत. अशातच दोन तीन दिवसात दादांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना धाप लागू लागली. तात्काळ त्यांना इस्लामपूरला हलवण्यात आले. तरीदेखील तीन दिवस दादांनी कारोनाला झुंज दिली आणि चौथ्या दिवशी हृदयविकाराच्या एकामागून एक तीव्र झटक्यांनी दादांची प्राणज्योत मालवली. 

      यातील सर्वात दुःखद बाब म्हणजे, आयुष्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये त्यांना घरातील एकाही सदस्याला भेटता आले नाही. कदाचित ते वाट पाहत पाहतच आपली लढण्याची धमक गमावून बसले असतील व अत्यंत विदारक आणि निराशाजनक मनःस्थितीत  त्यांनी या निष्ठुर जगाचा निरोप घेतला असेल!

       शेवटी करोना संसर्गापासून वाचायचं की दादांना वेळ द्यायचा या द्विधा अवस्थेत मी  स्वताला महत्त्व दिले याचा मला पश्चाताप होतोय. कारण योग्य ती पूर्ण खबरदारी घेऊन संसर्गापासून वाचता येणे शक्य होते, पण दादांचे ते दोन दिवस आयुष्यात परत केंव्हाच येणार नाहीत.

       दादा शक्य झाल्यास मला माफ करा. करोना ने मला त्या दोन दिवसांसाठी स्वार्थी बनवले. तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही.

                                                                                                         ... विश्व ताऱ्यांचे 

मृत्युशय्या