June 22, 2022

हिंदुत्व... की भारतीयत्व ?

        'हिंदुत्व' या एका शब्दाने 'भारतीयत्व' किती 'खचले' याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज चाललेले महाराष्ट्रातील राजकीय  नाट्य... ना या शब्दाने नोकरी मिळते, ना घर, ना शिक्षण.. बरं याचा नक्की अर्थ कसा घ्यायचा याच्याही अस्पष्ट गोंधळून टाकणाऱ्या व्याख्या.. कोण म्हणतो सिंधू नदी पलीकडे राहणारे सर्व हिंदू मग कोणत्याही धर्माचे असोत...तर लढतो मात्र फक्त हिंदू धर्मासाठी प्रभू श्री रामासाठी.. तर कोण म्हणतो.. १००० वर्षापूर्वी सर्व हिंदू होते आता परत हिंदू झाले पाहिजे... इथे एक लक्षात घेतले पाहिजे, काळावर अणि भूमीवर कोणाचाही शाश्वत अधिकार नसतो. पृथ्वीच्या आयुष्याच्या जवळ जवळ एक कोट्यांश एवढं क्षणिक आपले अल्पसे आयुष्य आहे. आपण जर असच आपली आर्थिक, व्यावसायिक, वैज्ञानिक, तांत्रिक, सामाजिक व संरक्षण क्षेत्रात  प्रगती करून देशाला व येणाऱ्या पिढ्यांना सर्व क्षेत्रात अग्रेसर न करता असाच अंतर्गत विवेकशून्य विषयात कलह करत बसलो तर उद्या दुसरी कोणती तरी परकीय महासत्ता आपल्यावर राज्य करून परत एकदा आपल्याला गुलामगिरीत टाकल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल. मग गुलामाचा कोणताच धर्म नसतो. त्याचा मालक सांगतो तो त्याचा धर्म.

     एक मात्र नक्की या हिंदुत्त्व म्हणा, इस्लाम म्हणा.. किंवा कोणत्याही धर्माचा उल्लेख असलेल्या शब्दांनी  सामाजिक तेढ मात्र नक्की निर्माण होते.. शब्द हवे तसे वळवले जातात, तुझा धर्म श्रेष्ठ की माझा हा न संपणारा वाद सुरू होती ज्याची निष्पत्ती काहीच नसते, झाला तर विनाशच होतो. 

     सत्तांतर कशासाठी? नोकऱ्यांसाठी, विकासासाठी, सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी!.. अ ह... ना ना... हिंदुत्वासाठी! हे कुठेतरी ५० वर्षांपासून चाललेले, अणि काही संघटनांनी आपल्याला राजकारण करण्यासाठी उबवत ठेवलेले वादळ, सर्व 'भारतीयांनी' एकत्र येऊन सद्सद विवेकबुद्धी ने शमवले पाहिजे. 

     धर्म हा वयक्तिक आस्थेचा भाग आहे. हा ज्याचा त्याने वयक्तिक पातळीवर जरूर आचारनात आणावा. पण जेव्हा समाज म्हणून विचार येईल तेंव्हा.. हिमालयाच्या शिखरांपासून पायथ्याला अभिषेक घालत असलेल्या हिंदी महासागरापर्यंत विस्तारलेल्या, हिमशिखरे, वाळवंट, गंगेची सुपीक मैदाने, पर्वतरांगा, समुद्र, वने, वन्यपशू-पक्षी या पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच जैव, अजैव विविधतेने नटलेल्या निसर्ग संपदेला, विविध मानवी परंपरांना, भाषांना, संस्कृतींना, राज्यांना एकत्र बांधून ठेवणारा, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, कबीर अशी संत परंपरा लाभलेला, छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनरुज्जीवित केलेला, महात्मा गांधी, क्रांतीवीर भगतसिंह, अशफाक़उल्ला खान सारखे स्वातंत्र्य सेनानी लाभलेला, शाहू, फुले, आंबेडकर, राजा राम मोहन रॉय यांसारखी पुरोगामी विचारसरणी लाभलेला, जिजामाता, लक्ष्मी वाई, सावित्री बाई यांसारख्या विरंगनांचा,  सावरकर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस सारखे देशप्रेमी लाभलेला, आर्यभट्ट, सी. व्ही. रमण, विक्रम साराभाई, डॉ. अब्दुल कलाम यांसारखे शास्त्रज्ञ लाभलेला आपला महान भारत देशच आठवला पाहिजे. भगव्या, निळ्या, हिरव्या झेंड्यांच्या गर्दीत आपल्या तिरंग्यालाच सर्वोच्च मानणे हे प्रत्येक सुजान भारतीय नागरिकांचे कर्तव्य असले पाहिजे.   

जहाँ डाल-डाल पर

सोने की चिड़ियां करती है बसेरा

वो भारत देश है मेरा !


टीप:  वर नमूद केलेल्या महापुरुषांच्या पूर्ण आयुष्याचा जीवन संदेश न घेता त्यांचा आयुष्यातील काही ठळक घटनांमध्ये आपल्याला हवे असलेले संदर्भ जोडून त्यांचे ही विभाजन करण्यात आलेले आहे, हा खऱ्या अर्थाने महापुरुषांचा त्यांच्या त्यागाचा पराभव आहे. 

                                                                                                                                    ... विश्व ताऱ्यांचे