असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा
गंध संपला तरी, सुगंध दरवळत रहावा !!
जीवन फक्त जगण्यापेक्षा ' जीवन ' बननं आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाला आनंदाची एक झुळूक देऊन पुढील प्रवासास लागण, हसत हसत, सुखात आणि दुखात ही ..... सुयोग हावळ
ज्या क्षणी स्त्री आपल्या स्त्री पणाला आवाहन देऊन पुरुष होऊ पाहते, खऱ्या अर्थाने तिचा ऱ्हास सुरु होतो. अशी गरज असती तर निसर्गाने स्त्री व पुरुष असे दोन भिन्न वर्ग निर्माण केलेच नसते. स्त्रियांची शक्ती स्थाने आणि पुरुषांची शक्ती स्थाने निसर्गतः भिन्न भिन्न आहेत. याचा अर्थ कृपया कोणी स्त्रियांना पुरुषांइतकी समान संधी दिली जाऊ नये असा घेऊ नये. पण संधींचा अर्थ पुरुषांना कमी लेखणे, संघटित होऊन, दोन्ही बाजूंचा विचार न करता पुरुषांवर दबाव प्रस्थापित करणे, स्त्रियांना दिलेल्या कायदेशीर अधिकारांचा उपयोग पुरुषांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक शोषण करण्यासाठी जर केला जात असेल तर हजारो वर्षांपासून जपलेली आपली समाज व्यवस्था विस्कळीत होण्याला वेळ लागणार नाही. आधुनिक काळात हे सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या स्त्री शक्तीने एकत्र कुटुंब व्यवस्था टिकवली होती आज तीच स्त्री स्वतंत्र होऊ पाहते आहे. मिळालेल्या स्वातंत्र्यातही ती आपल्या स्त्री पणाच्या जोरावर पुरुषांच्या स्वातंत्र्यावर आधिराज्य गाजवू पहात आहे. असा जर आपल्या समाजव्यस्थेचा पायाच जर ठिसूळ झाला तर व्यवस्था कशी टिकणार? आधुनिक काळात या एका गोष्टीमुळे नातेसंबंधात असंख्य गुंतागुंती झालेल्या पाहायला मिळतात. म्हणने एवढेच आहे आणि अतिशय स्पष्ट आहे की स्त्रियांनी स्त्री राहावे आणि पुरुषांनी पुरुष. एकमेकांच्या निसर्गदत्त स्वतंत्र अस्तित्वाचा दोघांनीही आदर करावा.
मध्यंतरी कोणीतरी सहजरीत्या बोलून गेले, तू तुझ्या दादांवर
लेख लिहिलास तसा भाऊंच्या विषयी असा लेख लिही पाहू.. ते मनात राहून गेले आणि आज
भाऊंच्या स्मृतिदिनी लिहायला बसलो.
श्री. सखाराम जोतिराम हावळ (गुरुजी), रा.पन्हाळा हे
माझ्या वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा. जवळ जवळ २० ते २२ जणांच्या हावळ कुटुंबियात सर्वजण माझ्या
आजोबांना भाऊ असे संबोधत. सहाजिकच ते हावळ कुंटुंबातील सर्वात ज्येष्ठ असल्याने
तेच कुटुंबप्रमुख होते.
वरून कितीही सक्त वाटणारे भाऊ, कमालीच कुटुंबवत्सल
होते. त्यांची कुटुंबाची व्याख्या ही केवळ ते आणि त्यांची मुलं, मुली, सुना एवढीच नव्हती
तर अखंड हावळ कुटूंब हे स्वतःचे कुटूंब मानून ते एकत्र राहण्यासाठी भाऊ सतत तळमळीने प्रयत्नशील राहिले. जसजशे
कुटूंबात नवीन सदस्य, नवीन विचारप्रवाह यायला लागले, तसे स्वाभविकणे असुरक्षित झालेले भाऊ आपल्याला दिसून येतात. कुटूंबाविषयीची
अतीव आत्मीयता आणि सर्वांनी आपले ऐकले पाहिजे, ही भावना हा एक भाऊंच्या स्वभावाचा कमकुवत पैलू होता असा मला
वाटतय. पण त्यामागे कुटुंबाबद्दल प्रचंड आपुलकी आणि सर्वांची प्रगती व्हावी ही प्रामाणिक भावना होती हे
मात्र मान्य करावेच लागेल. याचा प्रत्यय मम्मी-बाबांच्या सर्विसमूळे बाहेर
राहणाऱ्या मला नेहमीच यायचा, कारण ते माझ्याशी
बोलताना आमचे पन्हाळा आमचा प्रशांत, आमचा सुनिल (हे दोघे माझे काका आहेत) अशा भाषेल बोलायचे.. ते तुमच्याशी आमचा सनी (घरी मला सर्वजण सनी या नावाने ओळखतात) असं कधीच बोलले नसतील. असो!
नेहमीच कडक शिस्तप्रिय वाटणारे भाऊ आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र कमालीचे मवाळ आणि मायाळू झालेले दिसले.. माईच्या आईची आजारपणात घेतलेली प्रचंड काळजी यातून भाऊंचा प्रेमळ स्वभाव दिसत होता. साधी कधी रिक्षा ही न करणारे भाऊ, आलिकडच्या काळात मला कोल्हापूरला हॉटेलस मध्ये घेऊन जायचे. सी.पी.आर. जवळचा वडापाव बऱ्याचवेळा आम्ही मिठक्या मारत खाल्ला. सांगलीला आले की भाऊ माझ्यासोबतच झोपायचे. आमच्या गप्पा रात्री- मध्यरात्री पर्यंत रंगायच्या. या काळात मला भाऊंचा खरतर खुप जवळून परिचय आला. लहानपणी तर एक शिस्तप्रिय कडक शिक्षकी पेशातले आजोबा आणि परगावी राहणारा कधीतर भेटणारा नातू असच नातं होत. आता मात्र आलिकडे काळात एखाद्या मित्रासारख्या गप्पा व्हायच्या. याच काळात मला भाऊंचं खूप जवळून जीवन दर्शन झाले.. मग ते हिरकणी आजीचे कष्ट असो वा अण्णा आणि आप्पांच्या मदतीने शुन्यातून निर्माण केलेले 'विश्व’, असो की आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन असो किंवा माईच्या आईशीच लग्न करण्यासाठी भाऊंनी केलेले प्रयत्न असोत !
एका शब्दात सांगायचं झालं तर भाऊंचे जीवन हा एक
संघर्ष होता. ज्यात त्यांनी कधीच हार मानली नाही. जीवनात अनेक वादळे सामोरे आली.
त्यांना व्यक्तिश: प्रचंड त्यागाला सामोरे जावे लागले. स्पष्टवक्तेपणामुळे कटूता
ही आली पण आपल्या सर्वांच्या निरंतर सोबतीमुळे भाऊंनी प्रत्येक वादळातून मार्ग काढले.
लवकर स्वर्गवासी गेलेल्या वडिलांचा सर्वात मोठा मुलगा, मोठा भाऊ, कर्तव्य दक्ष वडील, एवढया सुनांचे
सासरे, घरातले थोरले आजोबा
एवढी सारी नाती भाऊंनी प्रभावीपणे निभावली. माझ्या मोठ्या काकाच्या घरातून जाण्यान
निर्माण झालेली पोकळी, प्रियंका आणि प्रतिभा या माझ्या बहिणींसाठी भाऊंनी परत एकदा आजोबा ते
वाडीलकीच्या भूमिकेत येऊन पूर्ण ताकदीनीशी पेलवलेली आपल्या सर्वांनी पाहीली आहे.
आपली कर्तव्ये पार पडण्यात ते कुठेच कमी पडले नाहीत.
आयुष्यभर पेटवत ठेवलेल्या कर्म-यज्ञामुळे आणि आशा आपेक्षांच्या यशापायशमुळे
शेवटी भाऊंचा देह जरी शिणला असला तरी मनाची ताकद मात्र अजून ही युवकांना लाजवेल
अशीच होती. वृद्धावस्थेत ही त्यांची कामाला जुंपून घ्यायची , धान्याची पोती
उचलायची क्षमता अफाट होती. माझ्या मते त्यांनी आता थोडे जपून राहायला हवे होते.
परंतु एवढ्या उर्जे ने भरलेले आयुष्यभर सुलाखून निघालेले मन ऐकल तर नवलच! आणि मग यातूनच त्यांना दवाखान्यात ऐन कोविड
काळात दाखल करावे लागले. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते उठून बसले होते. मला घरी
घेऊन चला म्हणत होते. पण डॉक्टर लोकांचे आकडे विसंगत होते आणि २-३ दिवसांतच भाऊ आम्हाला सोडून गेले.
मुख्य गाठ सुटली. आता धागे स्वतंत्र झाले आपापल्या स्वातंत्र्यात भरारी घेण्यासाठी. पण
गाठी मध्ये गुंतून राहण्यात असणारी शिस्तबद्ध आत्मीयता स्वातंत्र्याच्या पोरकेपणात
थोडीच मिळेल?
आपण
सर्व हावळ कुटुंबीय व जोडलेले सर्व परिवार असेच नेहमी एकमेकांसोबत एकमेकांसाठी
राहणे हीच खऱ्या अर्थाने भाऊंना आदरांजली दिल्या सारखी वाटेल. मला भाऊंचा म्हणावं तितका सहवास लाभला नाही याची ही खंत
राहिलच. असो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
.... विश्व ताऱ्यांचे